हेरले :खबऱ्या प्रतिनिधी/ चालकाचा ताबा सुटल्याने संजय घोडावत स्कूलची बस रस्त्याकडेच्या झाडावर आदळली. या अपघातात ३ विद्यार्थीसह १ महिला कर्मचारी किरकोळ जखमी झाली.
जखमींना कोल्हापुरात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोल्हापूर-सांगली महामार्गावर हेरले नजीक सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची (बस क्रमांक एम.एच-०९-सी.ए-०८७५) दुपारच्या सुमारास २१ विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. चालक सुहास शिवाजी मोरे यांचा बस वरील ताबा सुटल्याने बस रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली.
यात एका महिला कर्मचाऱ्यासह तीन विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. जखमींना कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या शाळेच्या बसेस नेहमी वेगाने जात असल्याच्या तक्रारी या रोडवरील ग्रामस्थ करत असतात. बस चालकांच्यातील पुढे जाण्याच्या चढाओढीमुळे विद्यार्थ्यांचा, वाहनधारक नागरिकांचा जीव धोक्यात आहे.

