इस्लामपूर; खबऱ्या प्रतिनिधी: जिल्ह्यात सर्वात कमी मनुष्यबळ असतानाही इस्लामपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात १६ हजार २२७ केसेस करीत तब्बल २ कोटी ३७ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ही रक्कम सन २०२१ सालाच्या तुलनेत दुप्पट आहे. वाहतूक शाखेची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईचा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांनीही धसका घेतला आहे.
सांगली – मिरज शहरातील वाहतूक शाखेकडे ६० ७० कर्मचाऱ्यांची नियुक्ती असते. इस्लामपूर शहराच्या वाहतूक शाखेला मात्र त्या तुलनेत खूपच कमी मनुष्यबळ आहे. सुरुवातीला एका अधिकाऱ्यासह १३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती वाहतूक शाखेकडे करण्यात आली होती. सध्या मात्र चार कर्मचारीच या शाखेकेकडे राहिले आहेत. आता वाहतूक शाखेचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक हे अशोक जाधव हे ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी अद्याप नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
गेल्या वर्षभराच्या कार्यकाळात पोलिस उपनिरीक्षक अशोक जाधव तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी किरण मस्के, धनाजी पाटील, बजरंग ढोकळे, महादेव पाटील, ज्योती पाटील यांच्या पथकाने इस्लामपूर शहर परिसर तसेच पुणे-बेंगळूर महामार्गावर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करीत जिल्ह्यात सर्वाधिक केसेस दाखल केल्या आहेत.
या वर्षभरात वाहतूक शाखेने अवैध प्रवासी वाहतुकीच्या २, दारू पिऊन वाहन चालविणे (ड्रंक अँण्ड ड्राइव्ह) च्या ७७ केसेस केल्या. शिवाय विना हेलमेट, विना लायसन्स वाहन चालविणे, अल्पवयीन वाहन चालक, वाहतुकीचे नियम मोडणे, नो पार्किंग, एकेरी वाहतुकीचे नियम मोडणे, विना नंबर प्लेट, ट्रीपल सीट आदींच्या ७ हजार ४४२ कारवाया करुन ६१ लाख ६२ हजार ७०० रुपयांचा दंड केला. तर महामार्गावर स्पिडगनच्या ८ हजार ७८४ एवढ्या कारवाई करत तब्बल १ कोटी ७५ लाख ७० हजार एवढा दंड केला आहे. वर्षभरातील या सर्व केसेसची संख्या १६ हजार २२७ एवढी असून एकूण दंडाची रक्कम २ कोटी ३७ लाख ३२ हजार ७०० रु. एवढी आहे. शिवाय ड्रंक अँड ड्राइव्ह व अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी न्यायालयाने केलेली दंडात्मक कारवाई वेगळीच. सन २०२१ साली याच वाहतूक शाखेने २५ हजार ४५८ केसेस करत १ कोटी १२ लाख ९७ हजार २०० रु दंड वसूल केला होता. सन २०२२ सालात मात्र केसेस कमी होवूनही दुप्पटीहून अधिक दंड वसूल झाला आहे. या शाखेची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

