पन्हाळा, खबऱ्या प्रतिनिधी : गायरान अतिक्रमणधारकांच्या आंदोलनात तिसर्या दिवशी येथील प्रांत कार्यालयासमोरच चिता रचून शंकर कांबळे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.तो पन्हाळा पोलिसांनी हाणून पाडला.
गेले तीन दिवस प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात प्रांत कार्यालयासमोरच चिता रचून आत्मदहन करणार असल्याचा इशारा मुलकीपड संघटनेचे अध्यक्ष व जनसुराज्य पक्ष जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे, पूजा कदम, अशोक गायकवाड यांनी दिला होता.
शुक्रवारी प्रांत कार्यालयासमोरच चिता रचून शंकर कांबळे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. असा कोणताही प्रकार होऊ नये म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यादरम्यान आ. डॉ. विनय कोरे यांनी शंकर कांबळे यांची भेट घेऊन चर्चा केली. आ. कोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, नायब तहसीलदार विनय कौलवकर, पन्हाळा पोलिस निरीक्षक अरविंद काळे, कोडोली पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड उपस्थित होते.

