मुंबई | शिंदे फडणवीस सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे शिवसेना आमदार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
बुलडान्याचे शिवसेना-शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे, किरीट सोमय्यांनी असे काही समजू नये की आता शिवसेना संपली. ही तीच शिवसेना आहे आणि आम्ही सत्तेत भाजपा आणि शिवसेना युती म्हणून काम करतोय, असं त्यांनी म्हटलं आहे.
आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब उद्धव साहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समज किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये, असंही संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
सोमय्यांनी यापुढे त्यांनी असं वक्तव्य करू नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशाराच संजय गायकवाड यांनी दिला आहे. यामुळे मात्र भाजप आणि शिंदे गटात ही मतभेद आता चव्हाट्यावर येत असल्याचं चित्र आहे.
हे चुकीच आहे. असं बोलणं किरीट सोमय्या यांनी उचित नाही, मात्र त्यांच्याबाबत मी काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

