बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी सुरू असलेलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला आणि इतरांविरोधात 500 कोटी रुपयांच्या अब्रुनकसानीचा दावा ठोकला आहे.
सॉफ्टवेअरचा वापर करून आपल्या मोबाईलच्या कथित बेकायदेशीर टॅपिंगद्वारे गोळा केलेल्या माहितीचा गैरवापर थांबवण्यासाठी कायमस्वरुपी मनाई आदेश काढण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. तसेच पटोले यांनी तत्कालीन महाराष्ट्र सरकारवर राजकीय हेतूने आपल्याविरुद्ध गुन्हेगारी कट रचल्याचाही आरोप केला आहे.
नाना पटोले यांनी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयातील वरिष्ठ दिवाणी न्यायालयापुढे अब्रुनुकसानीचा दावा सादर केला आहे. या प्रकणी वरिष्ठ विभागीय दिवाणी न्यायाधीश व्हीबी गोरे यांनी रश्मी शुक्ला आणि इतरांना नोटीस बजावली आहे. तसेच पुढील सुनावणीसाठी 12 एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे. या प्रकरणी अॅड. सतीश उके यांनी पटोलेंची बाजू न्यायालयात मांडली.
सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा कट रचण्यात आला होता. तसेच खोट्या फौजदारी खटल्यामध्ये अडकवण्याचाही डाव होता, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुध्य सचिव, पुणे व नागपूर येथील पोलीस आयुक्त आणि पुणे गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना नोटीस बजावली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिले आहे.
रश्मी शुक्ला यांची दुसऱ्यांदा दोन तास चौकशी
रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी अपर पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून कुलाबा पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात भारतीय टेलिग्राफ अॅक्टच्या कलम 26 तसेच भादवि कलम 166 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात 16 व 23 मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना दिले होते. त्यानुसार शुक्ला बुधवारी सकाळी 11 वाजता कुलाबा पोलीस ठाण्यात हजर झाल्या. त्यानंतर दोन तास त्यांची चौकशी करण्यात आली. 16 मार्च रोजी देखील शुक्ला यांची दोन तास चौकशी करण्यात आली होती.

