मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामात प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे रस्त्याचे काम रखडले असून या कामातील तांत्रिक अडचणी दूर करून रस्ता जलदगतीने होण्यासाठी मिरज शहर सुधार समितीने आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे घातले आहे. रस्ता कामात लक्ष देऊन काम मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी समितीला दिले आहे.
रविवारी मिरज शासकीय विश्रामगृहात मिरज शहर सुधार समितीचे सदस्य जहीर मुजावर, रामलिंग गुगरी, कार्यवाह असिफ निपाणीकर, युवा अध्यक्ष मुस्तफा रोहिले, मन्सूर शेख आदी सदस्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेतली.
समितीच्या वतीने अजितदादांना शिवचरित्र पुस्तकासोबत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सुमारे 11 किमी रस्त्यासाठी केंंद्रिय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे 27 कोटींचा निधी मंजूर केला आहे. 24 कोटींची निविदा मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे.. रस्ता रूंदीकरण, अतिक्रमण हटविणे आणि विद्युत खांब स्थलांतरित करणे आदी कामांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि महावितरण कंपनी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. यात राज्य शासनाने लक्ष देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे म्हणजे २२ मीटर रस्ता होण्यासाठी कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी सुधार समितीने केली आहे.

