खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे खंबाटकी, पसरणी घाटांमध्ये दरडी कोसळल्या असून, ठिकठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पावसाने बळीराजा सुखावला असून, पेरणीच्या कामांना वेग आला आहे. नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
पाटण – कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून, गुरुवारी सायंकाळपासून पावसाने पश्चिमेकडे पाटणपासून कोयना, हेळवाक घाटमाथ्यापर्यंत झोडपून काढले. आज झालेल्या दमदार पावसाने कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, धरणाचा पाणीसाठा ११.४८ टीएमसीवर पोहोचला आहे.
धरणात प्रतिसेकंद तब्बल १३१०२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या चोवीस तासांत धरणातील पाणीसाठ्यात १.२५ टीएमसीने वाढ झाली. सध्या धरणातील पाणीसाठा ११.४८ टीएमसीवर पोहोचला आहे. धरणातून पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी व पूर्वेकडील सिंचनासाठी कोणताही विसर्ग नाही.
पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत कोयनेत १४० मिलिमीटर, नवजात १६५ मिलिमीटर व महाबळेश्वरला २३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एक जूनपासून ते आजपर्यंत कोयनेत ५२० मिलीमीटर, नवजात ७२३ मिलिमीटर व महाबळेश्वरला ७१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
ओझर्डे धबधब्यावर गर्दी
कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने परिसरातील ओझर्डे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. पावसाचा जोर वाढल्याने धबधब्याच्या तिन्ही धारा कोसळत आहेत. हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटक सध्या धबधब्याबरोबरच पावसाचा मनमुराद आनंदही घेत आहेत.
तारळे- नागठाणे रस्ता बंद
तारळी नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलामुळे तारळे-नागठाणे रस्त्यावरील वाहतूक तारळी नदीला आलेल्या पुरामुळे काही काळ बंद ठेवली. सेवा रस्त्यावर पाणी आल्याने नागठाणे- तारळे वाहतूक रस्ता तात्पुरता बंद केला. तारळे- आंबळे- आवर्डे मार्गे कोंजवडे या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली.
पसरणी घाटात दरड रस्त्यावर
वाई – शहर व परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून, पश्चिम भागात जोर व जांभळी खोऱ्यात पावसाचा जोर अधिक आहे. सकाळी वाई- महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाटात दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आज सकाळपासूनच शहर व परिसरात संततधार पाऊस सुरू असून, अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. सुरूर- पोलादपूर या राज्य मार्गावर पसरणी घाटातील बुवासाहेब मंदिराजवळ सकाळी डोंगरावरून माती व दगड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. याबाबतची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सरकारी यंत्रणेची वाट न बघता रस्त्यावरील दगड दूर केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. सध्या घाट रस्त्यावर मुसळधार पाऊस आणि दाट धुके असल्याने या रस्त्याने प्रवास करताना वाहनधारकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
खंबाटकी घाटात दरड कोसळली
खंडाळा – पुणे- सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात दत्त मंदिराजवळ पावसामुळे दरड कोसळण्याने काही काळ वाहतूक विस्कळित झाली. यावेळी महामार्ग पोलिस उपनिरीक्षक श्याम गोरड व पथकाने येथील घाटातील सहाव्या वळणावर डोंगरावरून पडलेले माती, दगड जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक तत्काळ सुरळीत करण्यात आली. घाटमार्गातून जाताना वाहनचालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंबेनळी घाट सोमवारपर्यंत बंद
पाचगणी – महाबळेश्वर आणि कोकणाला जोडणाऱ्या सह्याद्रीच्या रांगांमधील अत्यंत संवेदनशील पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटातील सर्व प्रकारची वाहतूक आजपासून सहा जुलैपर्यंत पुढील चार दिवस पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पावसाळ्यात होणारी संभाव्य दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज आपत्कालीन घाटबंदीचा आदेश दिला.
आंबेनळी घाट परिसर हा अत्यंत तीव्र उतार, खोल दऱ्या आणि खचणारे भूस्तर यामुळे भूस्खलन व दरडप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. हवामान विभागाने वर्तवलेला अतिवृष्टीचा अंदाज लक्षात घेता, प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचलले आहे. सध्या या महामार्गावर विविध सुरक्षा सुधारणा, संरक्षण भिंती आणि क्रॅश बॅरिअर्स उभारण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. या प्रतिकूल हवामानात प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ नये, म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलादपूरचे तहसीलदार आणि रायगड पोलिस अधीक्षकांच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग
घाटबंदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. कोकणातून सातारा- पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी माणगाव-ताम्हाणी घाटमार्गे पुणे- सातारा अथवा पोलादपूर- चिपळूण- पाटण- सातारा- कोल्हापूर या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कुडाळ- मेढा रस्ता वाहतुकीसाठी बंद
कुडाळ – गेल्या सहा महिन्यांपासून जावळी तालुक्यातील कुडाळ गावाच्या हद्दीत असणाऱ्या निरंजना नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू होते; परंतु गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे निरंजना नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निरंजना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून, नदीवरील नव्या पुलाच्या परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने नागरिक, वाहनचालक, तसेच प्रवाशांना कुडाळ-सोनगाव मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग म्हणून मेढा- आलेवाडी- दरे- करंदी- आखाडे- हुमगाव-सोमर्डी -शेते मार्गे कुडाळ असा घोषित केला.
दिवशी घाटात कोसळलेल्या दरडी ‘बांधकाम’ने हटवल्या
ढेबेवाडी – ढेबेवाडी-पाटण रस्त्यावरील दिवशी घाटात गेल्या चार दिवसांत पावसामुळे कोसळलेल्या दरडी हटवून सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनचालक व प्रवाशांना दिलासा दिला. मात्र, वारंवार उद्भवणाऱ्या या धोक्यावर कायमस्वरूपी इलाज शोधावा, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशातून होत आहे.
येथून पाटणकडे जाण्यासाठी सुमारे १५ किलोमीटरचा घाटमार्ग आहे. दिवशी, मरळी, नवारस्ता, पाटण यासह डोंगर कपारीत वसलेल्या अनेक वाड्यावस्त्यांना ढेबेवाडीशी जोडणारा हा मुख्य मार्ग आहे. मात्र, घाटातील धोकादायक वळणे आणि सुटलेल्या स्थितीतील दरडींमुळे पावसाळ्यात वारंवार अपघात आणि वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात.
गेल्या चार दिवसांपासून परिसरात पावसाचा जोर वाढल्याने घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता गिरीश सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परता दाखवत जेसीबी, डंपर व अन्य यंत्रणेद्वारे कोसळलेले दगड व माती, मुरूम रस्त्यावरून हटवले.
संरक्षक जाळ्याकडे दुर्लक्ष…
दिवशी घाटातील भुस्तर हलका मुरमाड आहे. पावसाळ्यात पाणी मुरून वारंवार दरडी कोसळतात. घाटमार्गात अनेक दरडी रस्त्याकडे झुकल्या असून आतापर्यंत काही वाहनचालकांनी यात जीवही गमावला आहे. दरडीपासून बचावासाठी घाटात संरक्षक जाळ्या बसविण्याची मागणी दुर्लक्षित आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा अशीही मागणी होत आहे.

