विरोध केल्याने रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न
खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
शेटफळे (आटपाडी) येथे वृद्धेवर जीवघेणा हल्ला करून तिच्या अंगावरील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटण्यात आले. ३० जून रोजी पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विठ्ठल मारुती जाधव (वय ५६, मूळ रा. शेटफळे, सध्या रा. लेंगरेवाडी, ता. आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विठ्ठल जाधव यांची आई मालन मारुती जाधव (वय ८५) या ३० जून रोजी पहाटे लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्या परत घरात येत असताना अज्ञात चोरटा त्यांच्या पाठीमागून घरात शिरला. त्याने वृद्धेला धक्का देऊन खाली पाडले आणि लाथ मारून अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.
त्यांनी आरडाओरडा केला असता, चोरट्याने त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर रॉकेल ओतून काडेपेटीने पेटविण्याचा प्रयत्न केला. यात त्या जखमी झाल्या. यानंतर चोरट्याने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत ५ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, ५ ग्रॅम वजनाचे कानातील झुबे, ४ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वेल आणि चांदीचे पैंजण, असा एकूण ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास आटपाडी पोलिस करत आहेत.


