खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
झरे (ता. आटपाडी) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत अज्ञात चोरट्यांनी कोट्यवधींचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मंगळवारी मध्यरात्री खिडकी कापून करण्यात आलेल्या चोरीमध्ये सुमारे ९ किलो सोने, २५ किलो चांदी व रोकड असा कोट्यावधींचा ऐवज लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
चोरट्यांनी आत शिरताच सीसीटीव्ही कॅमेरे निष्क्रिय केले व सर्व फुटेज असलेला डीव्हीआर पळवून नेला, ज्यामुळे पुरावेच नष्ट झाले. सकाळी कर्मचारी आल्यावर प्रकार उघडकीस येताच लॉकरधारकांची गर्दी झाली व संताप उसळला. भरपाईच्या नियमांबाबत अस्पष्टता असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला होता तरी सुरक्षा वाढवली गेली नाही, अशी टीका होत आहे. घटनेची माहिती मिळताच ठसेतज्ज्ञ, श्वान पथक व आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आमदार गोपीचंद पडळकर व वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पाहणी केली. चोरट्यांनी नियोजनबद्ध चोरी केली असून स्थानिक माहितीदेखील मिळावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांसमोर गुन्हेगारांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलीसांनी पथके चोरट्यांचा माग काढण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.

