खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज शहर व उपनगरातील प्रभाग क्र. ४ हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यावेळच्या निवडणुकीत ही ओळख अस्पष्ट करण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांनी परफेक्ट नियोजन लावले आहे. सध्या या प्रभागात सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात हेच उमेदवार आघाडीवर आहेत.
संपूर्ण परिसर प्रचारात पिंजून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक गल्ली-बोळात, प्रत्येक चौकात आणि घरा-घरांत राष्ट्रवादीच्या विजयाचा निर्धार होऊ लागला आहे, अशी माहिती ज्येष्ठ उद्योजक शरद जाधव यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख धोरणांवर आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोकहितकारी कामगिरीवर सर्वसामान्य नागरिकांचा ठाम विश्वास आहे. याच विश्वासाच्या जोरावर प्रभाग क्र.४ मधील नागरिक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
पक्षाचे व पक्षाकडून पुरस्कृत असणाऱ्या उमेदवारांचा प्रचार जोशात आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. प्रभागातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सिद्धी सचिन पिसे, रेखा अविनाश भगत, शिशिर शरद जाधव आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पुरस्कृत उमेदवार शैलेश सतीश देशपांडे यांचा प्रचार वेगाने आणि प्रभावीपणे सुरू आहे. लोकांशी थेट संवाद, विकासाची ठोस हमी आणि विश्वासार्ह नेतृत्व यामुळे विजयाची खात्री दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. नागरिक स्वतःहून प्रचारात सहभागी होत असून उमेदवारांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश भगत यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या प्रचाराअंतर्गत ब्राह्मणपुरी , दिंडीवेस, दत्त कॉलनी, अमननगर, डॉ. पाठक हॉस्पिटल परिसर, टांगसाळ मारुती, दत्त चौक, मालगाव रोड, पाटील हौद, मुळके प्लॉट, इंदिरानगर वसाहत, गुलमोहर कॉलनी, कलावतीनगर आदी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला वर्ग, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेषतः उमेदवारांबद्दल सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. घरा-घरांतून, गल्ली-बोळांतून पूर्णपणे घड्याळ या चिन्हाचा सूर उमटत आहे.
प्रभाग क्र. ४ मध्ये राष्ट्रवादीचा विजय जवळपास निश्चित मानला जात असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. एकूणच प्रभाग क्र. ४ मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार हा केवळ निवडणूक प्रचार न राहता, जनतेचा विश्वास आणि विकासाची ग्वाही ठरत आहे. येणाऱ्या निकालात भक्कम आघाडी आणि निर्णायक विजय स्पष्टपणे दिसून येईल, असा विश्वास नागरिकांना असल्याचे उमेदवार सौ.सिद्धी पिसे यांनी सांगितले.

