- सांगली महापालिका निवडणुकीदरम्यान गंभीर घटना
- ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईचा आत्महत्येचा प्रयत्न
- काँग्रेस-राष्ट्रवादीवर दबाव टाकल्याचा आरोप
- रुग्णालय परिसरात राजकीय तणाव आणि गर्दी
महापालिका निवडणुकीदरम्यान एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली येथील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून, या घटनेमागे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. मात्र, काँग्रेसकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.
ही घटना सांगलीच्या प्रभाग क्रमांक १६ मधील आहे. या प्रभागातून शिवसेना ठाकरे गटाकडून उमर गवंडी हे निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजेश नाईक रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा आरोप आहे की, उमर गवंडी यांनी निवडणूक लढवू नये यासाठी त्यांच्यावर सातत्याने दबाव टाकण्यात येत होता.याच मानसिक तणावातून उमर गवंडी यांच्या आई मुमताज गवंडी यांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही बाब समजताच त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर रुग्णालयात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.दोन्ही गट आमनेसामने आल्याने रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या उषाताई जाधव यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजेश नाईक यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचं सांगत, कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आलेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, या घटनेमुळे सांगलीतील महापालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे.

