खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून एक महत्वाची राजकीय बातमी समोर येत आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाला भाजपनं धक्का दिला आहे. शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगरपरिषदेत एकत्र आल्यानं खळबळ उडाली आहे.
काँग्रेसच्या जोरावर भाजपा अंबरनाथ परिषदेत बहुमतात येणार आहे. तर यावर शिवसेना शिंदे गटानं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ही अभद्र युती असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. ही युती शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.
भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 अशा एकूण 32 नगरसेवकांची मोट
काँग्रेसमुक्त देश करणार असल्याची घोषणा भाजप पक्षाने केली होती, मात्र आता भाजपा पक्ष काँग्रेसला सोबत घेऊन अंबरनाथ नगरपरिषदेत बहुमतात येणार आहे. भाजपच्या तेजश्री करंजुले या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत. असं असताना भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 अशा एकूण 32 नगरसेवकांची मोट बांधून भाजपला बहुमत मिळवणार आहे. दरम्यान शिंदे गटाने ही तर अभद्र युती असल्याचा टोला भाजपाला लगावला आहे. ही युती शिवसेना शिंदे गटाच्या जिव्हारी लागली आहे. एकीकडे काँग्रेसमुक्त भारत करणाऱ्या भाजपाने काँग्रेसची हात मिळवणी करत शिवसेनेचा घात केल्याचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी म्हटलं आहे.
शिंदे गटाला सोबत घेऊन जर सत्तेत बसलो असतो तर ती अभद्र युती झाली असती, भाजपचं प्रत्युत्तर
गेल्या पंचवीस वर्षापासून भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटाला सोबत घेऊन जर सत्तेत बसलो असतो तर ती अभद्र युती झाली असती असं भाजपा उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी म्हटलं आहे. आम्ही अंबरनाथ नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटासोबत महायुती संदर्भात अनेकदा बोलणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही असे देखील पाटील यांनी म्हटलं आहे.
शिवसेना शिंदे गटाने 23 जागांवर विजय मिळवून सत्तेपासून दूर
अंबरनाथ नगरपरिषदेवर भाजपने झेंडा फडकला होता. याठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. याठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून मनिषा वाळेकर आणि भाजपकडून तेजश्री करंजुले पाटील यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले या विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष भाजपाचा झाला असला तरी देखील याठिकाणी सर्वाधिक नगरसेवकपदाचे उमेदवार शिवसेनेचे विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांच्या 59 जागांसाठी याठिकाणी निवडणूक पार पडली होती. शिवसेना शिंदे गटाने 23 जागांवर विजय मिळवला. तर भाजपने 16 जागा, काँग्रेस 12 जागा आणि अजित पवाराच्या राष्ट्रवादीने 4 जागांवर विजय मिळाला होता.

