जत प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
भाजपचे माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षांतील महत्त्वाच्या पदाधीकाऱ्यानी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या समर्थ नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. दोन माजी नगरसेवकांसह विविध पक्षांच्या प्रभावी कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे हाती घेतलेले निशाण, आगामी जत नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने कॉंग्रेस पक्षासाठी शुभसंकेत मानले जात आहेत.
आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे जत शहरात कॉंग्रेस पक्षाची ताकद गगनाला भिडल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपचे विद्यमान नगरसेवक प्रकाश माने आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका जयश्रीताई शिंदे यांचा समावेश आहे. ज्यामुळे विरोधी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
याव्यतिरिक्त, राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधील महत्त्वाचे युवा नेते सलीम नदाफ (टपाले), दस्तगीर नदाफ (टपाले ) यांनीही कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. रामरावनगर भागातील प्रभावी युवानेते म्हणून ओळखले जाणारे अनिल शिंदे, प्रमोद चव्हाण, अरबाज शेख, राजू नगारशी आणि जमीर अत्तार यांनीही आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने शहराच्या विविध भागांत कॉंग्रेस पक्षाची पकड मजबूत झाली आहे.

पक्ष प्रवेश सोहळ्यादरम्यान सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी जतच्या विकासाच्या ध्येयावर भर दिला.
माजी आमदार सावंत म्हणाले, जत शहराच्या विकासासाठी आता सर्वसमावेशक आणि भक्कम नेतृत्वाची अत्यंत गरज आहे. शहरातील प्रमुख नेत्यांनी आणि युवाशक्तीने आज माझ्या नेतृत्वावर आणि कॉंग्रेस पक्षाच्या धोरणांवर जो विश्वास दाखवला आहे, तो केवळ राजकीय प्रवेश नसून, जतच्या जनतेचा विश्वास जिंकण्याच्या दिशेने टाकलेले हे एक मोठे आणि निर्णायक पाऊल आहे. या सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने आपण शहराचा विकास निश्चितच साधू.
या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आप्पाराया बिरादार, सुजय नाना शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक रामचंद्र सरगर, तसेच कॉंग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

