खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
जत नगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘हाय व्होल्टेज’ राजकीय नाट्याला अखेर बुधवारी सायंकाळी पूर्णविराम मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते सुरेशराव शिंदे आणि माजी आमदार विलासराव जगताप यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आघाडीची अधिकृत घोषणा केली. या आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सुरेशराव शिंदे यांची निवड करण्यात आली असून बहुजन समाज पक्षालाही (बसपा) या आघाडीत सामावून घेण्यात आले आहे. संपूर्ण निवडणूक ‘घड्याळ’ या एकाच चिन्हावर लढविण्यात येणार असल्याचे विलासराव जगताप यांनी स्पष्ट केले.
जत नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय रंगमंचावर नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या होत्या. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीची नैसर्गिक युती मंगळवारी फिसकटली होती. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चेला वेग आला. अखेर बुधवारी दोन्ही गटांचे नेते एकत्र पत्रकार परिषदेत हजर राहून जनतेसमोर सक्षम आणि एकसंघ पर्याय उभा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या वेळी बोलताना सुरेशराव शिंदे म्हणाले, जत नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या शहराने मागील ३५ वर्षांपासून आमच्यावर कुटुंब प्रमुखाप्रमाणे विश्वास ठेवला आहे. गुंडगिरी, टोळीयुद्ध आणि असामाजिक प्रवृत्तीला आळा घालत नागरिकांना सुरक्षित, सुजलाम-सुफलाम जत देणे हेच आमचे ध्येय आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आता एकत्र येऊन ही निवडणूक लढविणार आहेत. बसपाही आमच्यासोबत आहे. बसपाला दिलेल्या जागांवर ते त्यांच्या चिन्हावर उमेदवार उभे करतील, परंतु उर्वरित सर्व जागांवर आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार ‘घड्याळ’ या एकाच चिन्हावर लढतील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. या आघाडीमुळे जत नगरपालिकेच्या रणांगणात नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्ष काय भूमिका बजावणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

