खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती नियोजनामध्ये सरस ठरत असताना सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी एकजूट ठेवण्यामध्ये धडपडत आहे. अशातच खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात दौरे सुरू केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची भूमिका काय असणार? याकडे इच्छुकांचं लक्ष लागून राहिले आहे.
महायुतीविरोधात लढत असताना महाविकास आघाडीमध्ये एकजूट असावी, अशी इच्छुकांची भावना आहे. त्या संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढण्याची चिन्हे आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आणि ऊस हंगामाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच सांगली जिल्ह्यातील दोन आमदार आणि एका खासदारांची पुण्यातील एका संकुलात बंद खोलीत बैठक पार पडली. एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात हजर असलेले खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम, माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील या बैठकीला उपस्थित होते.
निवडणुकीच्या तोंडावर यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना किती एफआरपी द्यावी. या संदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. यंदाचा हंगाम कधी सुरू करावा. याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
येत्या १६ ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २४ वी ऊस परिषद होणार आहे. या ऊस परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर आवाज उठवला जाणार आहे. साधारण त्यानंतरच सांगली जिल्ह्यातील उसाची एफ आर पी आणि हंगाम सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सांगली कुपवाड महानगरपालिका, सांगली जिल्हा परिषद, जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये भूमिका काय असावी, यासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसली तरी पुण्यात यासंदर्भात बैठक झाल्यानंतर इच्छुकांच्या अशा पल्लवीत झाले आहेत.
महायुती एकत्र लढत असताना स्वतंत्र लढल्यास इच्छुकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा इच्छुकांना होणार आहे. त्यामुळे पुण्यातील बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? हे माहिती करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची फोन वाजत आहेत.