खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली ते अंकली रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी आज दिले. या रस्त्याची पाहणी त्यांनी आज केली. यावेळी त्यांच्यासोबत महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, आकाशवाणी जवळील रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. हे काम महानगरपालिका व मोजणी विभाग यांच्याशी समन्वय ठेवून वाहतूक विस्कळीत न होता लवकरात लवकर पूर्ण करावे. उपनगरातील शेत व मोकळे प्लॉटमधील पाणी रस्त्यावर येते, त्याचा वेळीच निचरा होईल, या दृष्टीने महानगरपालिकेने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबतीत नागरिकांकडून बऱ्याच तक्रारी येत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर खड्डे असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. सांगलीतील शास्त्री चौक ते शंभर फुटी रस्त्यावरील हद्द मोजणी विभागाने तातडीने निश्चित करावी, असे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, रस्त्याची कामे करताना जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार होऊ नयेत, यासाठी महापालिकेने पाणीपुरवठा विभागाचा एक कर्मचारी नियुक्त करावा. तो कर्मचारी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्कात राहील, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख क्रांतीकुमार मिरजकर यांना योग्य समज देण्यात आली.