खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
शुक्रवार रात्रीपासून तासगाव तालुक्यासह परिसरात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. या अतिवृष्टीमुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आज (शनिवार, 27 सप्टेंबर) तासगाव येथे माजी खासदार संजयकाका पाटील यांचा नियोजित कार्यकर्ता संवाद मेळावा स्थगित करण्यात आला आहे.
माजी खासदार संजयकाका पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, “सध्या हवामान प्रतिकूल असून, कार्यकर्त्यांनी मेळाव्यासाठी प्रवास करणे उचित ठरणार नाही. सुरक्षितता महत्त्वाची असल्याने दसऱ्यानंतर या संवाद मेळाव्याची नवी तारीख जाहीर केली जाईल.”
दरम्यान, संततधार पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने हालचाल करणे कठीण झाले आहे. या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना संजयकाका पाटील म्हणाले की, “गरज असेल तरच बाहेर पडावे. प्रत्येक कार्यकर्त्याने या काळात खबरदारी घेऊन गरजूंना मदत करावी, हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.”
कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्याची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.