खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
अंकली (ता. मिरज) येथील पुलावरून कृष्णा नदीत उडी मारलेल्या महिलेचा मृतदेह चोवीस तासानंतर सापडला. अनिता अरविंद हजारे (वय 50, रा. अग्रण धुळगाव, ता. कवठेमहांकाळ) असे त्या महिलेचे नाव आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
अग्रण धुळगाव येथील हजारे दाम्पत्य शनिवारी दुपारी काही कारणानिमित्त कोल्हापूरला निघाले होते. अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावर आल्यानंतर हजारे यांच्या मोबाईलवर कॉल आला. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली. मोबाईलवर बोलणे झाल्यानंतर अनिता यांनी पती अरविंद यांच्या हातात मोबाईल देत अचानक पुलाच्या कठड्यावरून नदीत उडी ठोकली. पाण्यात पडलेल्या अनिता या प्रवाहाला वेग असल्यामुळे पुढे वाहून गेल्या. सांगलीतील स्पेशल रेस्क्यू फोर्सला तत्काळ पाचारण केले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य केले, परंतु त्या मिळून आल्या नव्हत्या. रविवारी पुलाजवळ हा मृतदेह मिळून आला.
पूल निम्मा सांगलीचा, निम्मा जयसिंगपूरचा
अंकली येथील कृष्णा नदीवरील पूल हा निम्मा सांगली ग्रामीणच्या हद्दीत तर निम्मा जयसिंगपूर पोलिसांच्या हद्दीत येतो. परंतु अनिता हजारे यांनी पुलाच्या बरोबर मधोमध उडी मारली होती. त्यामुळे दोन्ही पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु शोधकार्यादरम्यान अनिता यांचा मृतदेह सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडल्याने या पोलिस ठाण्याकडे नोंद करण्यात आली.