खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
इरळी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथे अमली पदार्थ निर्मितीचा (ड्रग्ज) कारखाना दुबईत बसून चालवणारा, सिंथेटिक ड्रग्जचा मोठा उत्पादक आणि इंटरपोलच्या ‘रेड कॉर्नर’ नोटीसवर असलेल्या मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला याला अखेर भारतात आणण्यात आले.
गेल्या काही दिवसात मुंबई शहरात एमडी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. एमडी ड्रग्जला प्रचंड मागणी असल्याने त्याच्या तस्करीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरू असताना गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कुर्ला येथे काहीजण एमडी ड्रग्जच्या डिलिव्हरीसाठी येणार असल्याची माहिती युनिट सातच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने कुर्ला येथील चेंबूर-सांताक्रूज लिंक रोड, सीएसटी रोड, सयाजी पगारे चाळीजवळ परवीन बानो गुलाम शेख या महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्याकडून पोलिसांनी 641 ग्रॅम वजनाच्या एमडी ड्रग्जसह 12 लाख 20 हजारांची कॅश आणि 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त केला होता. तिला ते ड्रग्ज साजिद नावाच्या एका व्यक्तीने दिले होते. त्यानंतर या पथकाने साजिद मोहम्मद आसिफ शेख ऊर्फ डॅब्स याला ताब्यात घेतले होते. त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी सहा कोटींचे तीन किलो एमडी ड्रग्ज, 3 लाख 68 हजाराची रोकड जप्त केली होती.
तपासात साजिद हा दुबईत वास्तव्यास असलेल्या काही ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात होता. या ड्रग्ज तस्करांनी दुबईत राहून त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने सांगली परिसरात एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना सुरू केल्याचे उघडकीस आले होते. या कारखान्यात एमडी ड्रग्ज तयार झाल्यानंतर ते मुंबईसह गुजरातच्या सुरतमधील ड्रग्ज तस्कराच्या मदतीने विक्री केले जात होते. या माहितीनंतर या पथकाने सुरत येथून दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून अन्य आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून सांगलीतील एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश झाला होता.
त्यानंतर या पथकाने सांगलीतील ड्रग्ज कारखान्यात छापा टाकला होता. या कारखान्यातून 245 कोटी रुपयांचा 122 किलो 500 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. त्यांच्या चौकशीत ताहेर सलीम डोला आणि मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला हे दोघेही या कटातील मुख्य सूत्रधार असून, ते दोघेही दुबईतून एमडी ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली होती. त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असताना सलीम डोलाला जून 2025 मध्ये पोलिसांनी अटक केली, तर मुस्तफाला युएई येथून अटक करून त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले. सीबीआयकडून मुस्तफाचा ताबा नंतर गुन्हे शाखेला सोपविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलिस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी दोन मुख्य आरोपींसह बारा आरोपींना अटक केली आहे.
256 कोटींचा मुद्देमाल जप्त
मुस्तफाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी दोन मुख्य आरोपींसह बाराजणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 252 कोटी 28 लाखांचे 126 किलो 141 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, 3 कोटी 64 लाख 15 हजाराची रोकड, 1 लाख 50 हजार 420 रुपयांचे सोन्याचे दागिने, 10 लाखांची एक सफेद रंगाची स्कोडा कार, 50 हजारांची एक बाईक, ड्रग्ज बनविण्याचे साहित्य असा 256 कोटी 49 लाख 96 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सांगली जिल्ह्यात तीन मोठ्या कारवाया
सांगलीपासून सहा किलोमीटरवरील कुपवाड येथे सुमारे शंभर किलो एमडी अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. 2024 मध्ये ही कारवाई केली. पुण्यात निर्मिती केलेल्या या अमली पदार्थांचा साठा कुपवाडला केलेला होता. अगदी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही कारवाई केली होती पुणे पोलिसांनी.
विटा येथे 27 जानेवारी 2026 रोजी छापा टाकला आणि एमडी अमली पदार्थ कारखाना नष्ट केला. तेथे 14 किलोवर एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्या ड्रग्जची किंमत सुमारे 30 कोटी होते. छाप्यावेळी तिघांना अटक करून नंतर आणखी तिघे गजाआड केले होते. कारखाना भाड्याने देणार्या महिलेलाही अटक केली. सर्वजण सध्या कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आहेत.
इरळी गावात कारवाई केली होती. तेथे 126.141 किलो मेफेड्रोन जप्त केले होते. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे 252 कोटी रुपये होते. ही कारवाई मुंबई पोलिसांनी केली होती. मुंबईतील क्राईम शाखा युनिट सातने ही कारवाई 2024 मध्ये केली होती.