तासगाव : गोपनीय खबऱ्या प्रतिनिधी
सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची ऊस बिले गेल्या दीड वर्षापासून थकीत आहेत. अद्यापही हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची बिले मिळाली नाहीत. ही बिले तातडीने मिळावीत, यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे निघाले. मात्र आजही कोट्यवधींची ऊस बिले थकीत आहेत. ही बिले तात्काळ मिळावीत, यासाठी माजी सैनिक जोतिराम जाधव यांनी येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे. याच आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या दौऱ्यात गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे. हे आंदोलन नेमके कुठे व कशा प्रकारचे होईल याची दिशा उद्या पत्रकार परिषद घेऊन ठरवणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे.
खासदार संजय पाटील यांच्या मालकीचे तासगाव व नागेवाडी हे साखर कारखाने आहेत. मात्र या दोन्ही कारखान्यांची कोट्यावधी रुपयांची ऊस बिले गेल्या दीड वर्षापासून थकीत आहेत. ही बिले मिळावीत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना यांच्यासह माजी सैनिक जोतिराम जाधव यांनी अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे केली आहेत. काही महिला शेतकऱ्यांनी तर खासदार संजय पाटील यांच्या कार्यालयासमोर मुंडनही केले होते. तर आंदोलनाचा भाग म्हणून शहरातून खासदार पाटील यांच्या नावाने भिकही मागितली गेली.
आंदोलनाच्या वणव्यानंतर खासदार पाटील यांनी कोट्यवधी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत. मात्र अजूनही हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांची बिले थकीत आहेत. अनेक आंदोलनानंतरही खासदार पाटील तारीख पे तारीख देऊन शेतकऱ्यांना गंडवत आहेत. त्यांनी दिलेले अनेक चेकही बाऊन्स झाले आहेत. परिणामी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या आदेशाने तासगाव आणि नागेवाडी कारखान्यांवर आर. आर. सी. अंतर्गत कारवाई सुरू आहे.
या दोन्ही कारखान्यातील साखरेचे टेंडर संबंधित तहसीलदारांनी काढले होते. यातील नागेवाडी कारखान्याच्या साखरेसाठी व्यापाऱ्यांनी टेंडर भरले. मात्र तासगावच्या साखरेसाठी कोणीही व्यापारी टेंडर भरायला तयार होईनात. परिणामी शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाचे घोंगडे आजही तसेच भिजत आहे.
यावर्षी कोरोनासह अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बळीराजा आर्थिक संकटात आहे. अनेकांच्या चुलीही पेटणे अवघड झाले आहे. मात्र खासदार पाटील हे शेतकऱ्यांना ‘तुमचा रुपयाही बुडणार नाही’, अशी गुळगुळीत आश्वासने देत आहेत.
प्रशासनाने आर. आर. सी अंतर्गत तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना ऊस बिले द्यावीत, या मागणीसाठी माजी सैनिक जोतिराम जाधव हे गेल्या तीन दिवसांपासून येथील तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रहास बसले आहेत. दरम्यान येत्या 26 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. भिवघाट येथे त्यांचा सत्कार आयोजित केला आहे. खासदार संजय पाटील यांनी हा कार्यक्रम जोरदार होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ठिकाणी बैठका घेऊन सत्कार समारंभाचे नियोजन केले जात आहे.
या कार्यक्रमात खासदार पाटील हे स्वतःची पाठ थोपटून घेणार आहेत. मात्र एकीकडे शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची ऊस बिले थकवायची व दुसरीकडे गडकरींच्या दौऱ्यात स्वतःचा उदो उदो करायचा, असली दुटप्पी भूमिका खासदार पाटील यांनी घेतली आहे. मात्र याच खासदारांनी शेतकऱ्यांच्या चुलीत अक्षरशः पाणी ओतले आहे. ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत त्यांना वार्यावर सोडून खासदार पाटील हे जर सत्कार समारंभात स्वतःचा व पक्षाचा उदोउदो करणार असतील तर हे कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा गर्भित इशारा देऊन माजी सैनिक जोतीराम जाधव यांनी थेट गडकरींच्या दौर्यातच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जाधव यांच्या या इशाऱ्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. अन्नत्याग सत्याग्रहाचा पुढील भाग म्हणून गडकरींच्या दौर्यात गनीमी काव्याने आंदोलन करण्याचे नियोजन जाधव करीत आहेत. त्यासाठी त्यांनी उद्या गुरुवार सकाळी अकरा वाजता आंदोलनस्थळी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत गडकरींच्या दौर्यात नेमके कोणते व कसे आंदोलन केले जाईल, त्याचे ठिकाण काय आहे, याची माहिती दिली जाणार आहे. या पत्रकार परिषदेत या आंदोलनाची दिशा ठरवू, असा इशारा जाधव यांनी दिला आहे. दरम्यान जाधव यांच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनाचा ताप वाढला आहे, हे मात्र नक्की.