
मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

बेडग (ता. मिरज) येथे शेत जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण, दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्याबद्दल माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे व युवा राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे यांच्यासह पाच जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक माने यांनी सांगितले.
याबाबत राहुल सुरेश ओमासे (वय 24, रा. बेडग) यांनी फिर्याद दिली आहे. मुंडे यांचे मेहुणे जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे, रघु नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे (सर्व रा. बेडग) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, मुंडे यांचे मेहुणे जितेंद्र ओमासे व राहुल ओमासे यांच्यात बेडग येथील दीड एकर शेतजमिनीच्या मालकीवरून वाद आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. न्यायालयाकडून आदेश मिळाल्याचा दावा करीत दि. 22 रोजी दुपारी दोन वाजता जितेंद्र ओमासे, रघु नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे हे सर्वजण बेकायदा जमाव जमवून राहुल ओमासे यांच्या शेतात गेले.
जमीन ताब्यात घेण्यासाठी राहुल यांना झोपडीतून घराबाहेर काढून त्यांची झोपडी पाडून नुकसान केले. यावेळी राहुल यांचे वडील सुरेश यांना मारहाण करण्यात आली. राहुल व त्यांच्या आईला शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात जितेंद्र ओमासे यांच्यासह चार साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयितांना अद्याप अटक केली नसल्याचे तपास अधिकारी, उपनिरीक्षक दीपक माने यांनी सांगितले.