
- खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
एका मोटार सायकल चोरीच्या तपासात विटा पोलिसांना विविध ठिकाणच्या तब्बल १० मोटा रसायकलींच्या चोरीचा छडा लावण्यात यश आले आहे. या प्रकरणी दोघा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ३ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या गाड्या जप्त केल्या आहेत.


प्रितम सदाशिव शिंदे (वय २१, रा. पारे ता खानापूर) आणि बादल अब्दुल पिरजादे (वय ३२, रा. बर्वे मळा, विटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी किशोर बाळासो यादव (रा.रेणावी, ता.खानापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात १९ मार्च रोजी रात्री आठ वाजता विटा शहरातील घुमटमाळ येथून आपली मोटार सायकल चोरीला गेल्याची फिर्याद रेणावीच्या किशोर यादव यांनी विटा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या. हा तपास सुरू असताना पथकातील अंमलदार अमोल पाटील आणि महेश देशमुख यांना टीप मिळाली की, विट्याचे उपनगर असलेल्या सुळेवाडी हद्दीत खानापुर रस्त्यावर एकजण चोरीच्या मोटारसायकलवरुन फिरत आहे. त्यावर गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार अमोल पाटील दिग्विजय कराळे, महेश संकपाळ, सत्यवान मोहिते, कॅप्टन गुंडवाडे उत्तम माळी, हेमंत तांबेवाघ, संभाजी सोनवणे, किरण खाडे, महेश देशमुख,अक्षय जगदाळे, सोमनाथ कोळी तसेच विजय पाटणकर, करण परदेशी आणि सांगलीच्या सायबर शाखेचे सतीश अलदर यांनी त्या ठिकाणी सापळा रचून त्या व्यक्तीला पकडले.
त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रितम शिंदे असल्याचे सांगितले. त्यावर मोटारसाकलबाबत चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यास ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणून सखोल तपास केला असता त्याने ती मोटारसायकल ही घुमटमाळ विटा येथून चोरल्याची कबुली दिली. या वरून त्यास अटक करण्यात आली. यानंतर पोलीस कोठडीत रिमांड मध्ये अधिक तपास केला असता त्याने सांगली जिल्ह्यासह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातही मोटरसायकल चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. प्रीतम शिंदे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून विटा, आटपाडी, कासेगाव, हातकणंगले (जि. कोल्हापूर) आणि तळबीड (जि. सातारा) येथील पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्या विरोधात मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत असे निष्पन्न झाले. या सर्व गुन्हयांची कबुली त्याने दिली असून तो ती मोटारसायकल चोरुन विट्यातील बर्वे मळा येथे राहणाऱ्या बादल पिरजादे यास विक्री करीत असल्याचे सांगितले.
दरम्यान, या प्रकरणातील बादल पिरजादे यास परवाच विटा पोलिसांनी ड्रग्जची अर्थात नशेची इंजेक्शन्स विक्री प्रकरणी अटक केलेली आहे. त्यामुळे अशा चोरीच्या मोटर सायकल्स तो ड्रग ट्रॅफिकिंग अर्थात अमली पदार्थांच्या विक्रीसाठी वापरत असावा. याच बरोबर काही मोटरसायकली या तरुणांना ड्रगच्या आहारी जाऊ देऊन त्याच्या मोबदल्यात त्याच्याकडे ठेवलेल्या आहेत. अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे.