
केंद्रीय गृह मंत्रालयाने 2023 सालात केलेल्या सर्वेक्षणात सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलीस ठाण्याने महाराष्ट्रात सलग दुसर्यांदा अव्वल स्थान मिळवले आहे. राज्यात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या पुसेगाव पोलीस ठाण्याचा मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

तत्कालीन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सध्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, तत्कालीन पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, सध्या पंढरपूर येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक आणि तत्कालीन सपोनि विश्वजित घोडके यांच्या कार्यकाळात 2022 साली केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे स्पर्धेत पुसेगाव पोलीस ठाणे राज्यात अव्वल आणि देशात टॉप टेनमध्ये आले होते.

तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक बाळासाहेब लोंढे यांच्या कार्यकाळात 2023 सालासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा पाठवण्यात आला होता. स्पर्धेचे सर्व निकष पूर्ण करण्यासाठी समीर शेख, अजयकुमार बन्सल, गणेश किंद्रे, बाळासाहेब लोंढे, सपोनि संदीप शितोळे, चेतन मछले, सध्याचे सपोनि संदीप पोमण, अधिकारी, कर्मचार्यांनी प्रयत्न केले होते. प्रसिद्धी माध्यमे, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांच्या प्रयत्नांना यश येऊन, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पडताळणीत पुसेगाव पोलीस ठाणे सलग दुसर्यांदा राज्यात अव्वल ठरले आहे.
सहाय्यक फौजदार सुरेश चव्हाण, आनंदराव जगताप, सचिन माने, सुधाकर भोसले, सचिन जगताप, अमृता चव्हाण आणि सहकार्यांनीही पोलीस ठाण्याचे कामकाज व्यवस्थित ठेवण्यासाठी परिश्रम घेतले होते. यापूर्वी नंदकुमार पिंजण, दयानंद ढोमे, राजेंद्र सावंत्रे, धनंजय पिंगळे, विश्वजित घोडके, संभाजीराव गायकवाड, उमेश तावसकर, घाडगे, संजय बोंबले या अधिकार्यांनी पुसेगाव पोलीस ठाण्याचा कारभार समाजाभिमुख ठेवला होता. त्यानंतरच्या अधिकार्यांनी त्याच पद्धतीने वाटचाल केल्याने पुसेगाव पोलीस ठाण्याला हा पुरस्कार सलग दुसर्यांदा मिळाला आहे. या पुरस्काराबद्दल पुसेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक होत आहे.