
इस्लामपूर प्रतिनिधी | बारावीच्या विद्यार्थ्यांचा आज पहिला पेपर होता. त्याचे परीक्षा केंद्र असलेल्या येथील केआरपी कॉलेजसमोर लावलेल्या पाच ट्रकमुळे केंद्रावर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.काही विद्यार्थ्यांच्या पायावरून दुचाकीची चाके गेल्याने गोंधळ निर्माण झाला.

याबाबत अधिक माहिती अशी बारावीचा आज पहिला पेपर असल्याने प्रत्येक केंद्रावर पालकांची विद्यार्थ्यांना सोडायला प्रचंड गर्दी झाली होती. तशीच गर्दी येथील शिराळा नाका परिसरात असलेल्या केआरपी महाविद्यालयासमोरील रस्त्यावर झाली होती. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश करायला एकच फाटक असल्याने मोठी ढकलाढकली होत होती.

त्यातच महाविद्यालयाच्या फाटकापासून सलग पाच ट्रक पार्किंग करून चालक निघून गेले होते. त्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. पेपर सुटल्यावर फाटकामधून विद्यार्थ्यांनी बाहेर प्रवेश करताच मोठी ढकलाढकली झाली. त्यातच रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी झाले. फाटकापासून ओळीने ट्रक लागल्यामुळे मुलांना चालताही आले नाही. पालकांनी नाराजी व्यक्त केली.