
मिरज : शहरातील भारतनगर परिसरातील विद्यार्थ्याने बारावी परीक्षेपूर्वीच राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रथमेश बाळासाहेब बिराजदार (वय १८) असे त्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

प्रथमेश बिराजदार हा शहरातील भारतनगर येथे पालकांसमवेत राहत होता. तो मिरजेतील एका खासगी अॅकॅडमीत बारावीचे शिक्षण घेत होता. मंगळवारपासून बारावीचे पेपर दरम्यान, यापूर्वी सोमवारी सायंकाळी संबंधित अॅकॅडमीमध्ये बारावीचा पेपर कसा सोडवायचा, याबाबत माहिती देण्यात आली होती.

अकॅडमीमधून प्रथमेश हा रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरी परतला. त्यानंतर तो अभ्यासासाठी घराच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या खोलीत गेला. नंतर त्याने खोलीतील अँगलला गळफास घेऊन जीवन संपविले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी पालकांनी प्रथमेश याला हाक मारली. परंतु, प्रथमेश याने कोणतेही उत्तर न दिल्यामुळे पालकांनी प्रथमेश याच्या खोलीत जाऊन पाहणी केली, त्यावेळी प्रथमेश याने अँगलला गळफास घेतल्याचे निदर्शनास येताच पालकांना धक्काच बसला.
प्रथमेशचे वडील मिरज कृषी विभागात सहायक म्हणून काम करतात. प्रथमेश हा अभ्यासातही हुशार होता. मात्र बारावी परीक्षेच्या ताण-तणावामुळे त्याने परीक्षेपूर्वीच हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू होती. परंतु त्याने नेमके कोणत्या कारणातून जीवन संपविले, हे मात्र समजू शकले नाही. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.