सांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल प्रतिटन 3 हजार 100 रुपये देण्याचा निर्णय जिल्ह्यातील साखर कारखानदार यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.अशी माहिती माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करत कारखानदारांनी घेतलेला हा निर्णय अमान्य असल्याचे सांगितले.
कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे सांगली जिल्ह्यात दर द्यावा अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली. कडेगाव येथे डॉ.पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखाण्याचे संचालक आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने आयोजित कारखानदारांच्या बैठकीत हा 3 हजार शंभर रुपये पहिली उचल ऊसदर देण्याचा निर्णय सर्वानुमते झाला .
या बैठकीत खासदार संजय पाटील, क्रांती कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार अरुण लाड,आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, उदगिरी शुगरचे उत्तमराव पाटील, युवा नेते विशाल पाटील, राजारामबापू कारखान्याचे व्हा.चेअरमन विजय पाटील, दत्त इंडियाचे जितेंद्र धारु, हुतात्मा कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी आदी उपस्थित होते.

