मुंबई – मुंबई पोलिसांना शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या बंगल्याची सुरक्षा करण्यात आणि एकुणच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रकरण हाताळण्यात अपयश आल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव नाराज आहेत.
याची माहिती माध्यमांना मिळाली पण पोलिसांना कशी मिळाली नाही? असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांना केला आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उद्धव ठाकरे यांच्यासह इतर महत्वाच्या नेत्यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर आता संबंधित पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे गृहखातेही आता बॅकफुटवर आले आहे.
नुकतीच गृहविभागाची सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी बैठक संपली. या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कालच्या घटनेची माहिती पोलिसांना कशी मिळाली नाही? असा थेट सवाल मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
पोलिसांना सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या बंगल्यासमोर आंदोलन प्रकरण हाताळण्यात अपयश आले. माध्यमांना हल्ल्याची माहिती कळते, पण सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळत नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इभ्रत काढीत सुरक्षेवरून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनीही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यानंतर मुख्यमंत्र्यांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याच प्रकरणावर गृहविभागाची बैठकही झाली आहे, त्यात ही नाराजी व्यक्त झाली आहे. त्यामुळे आता संबंधित पोलिसांवर प्रकरण हाताळण्यात अपयश आल्याचा ठपकाही ठेवला जात असून आता या प्रकरणी कारवाई केली जाणार आहे.

