मुंबई : महाज्योती, सारथी आणि बार्टी यांसारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या योजनांप्रमाणे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामध्येही एकसारखेपणा आला पाहिजे. यासाठी इतर समाजाच्या महामंडळांना जो निधी दिला जातो, त्याप्रमाणे निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाच्या सचिवांना दिले.
तसेच मौलाना आझाद महामंडळाकडून राबविण्यात येणार्या कर्ज योजनांची सांगड केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या विश्वकर्मा योजनेशी घालता येईल का, हेही तपासून घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्यालय संभाजीनगर येथील हज हाऊस येथे स्थलांतरित करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.

