कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील एका मंडळ अधिकाऱ्यांनी मंडळाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच आपल्याला एक उमेदवार पाहिजे आहे अशी अलिखित जाहिरात काढली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून शासन निर्णयाप्रमाणे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर पणे उमेदवार ठेवायचा नसतो, मात्र याठिकाणी कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच उमेदवाराची शोधाशोध सुरू झाल्याने याठिकाणी कायदेशीर कारभाराची अपेक्षा सर्वसामान्य जनतेने करायची का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल सहाय्यक, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी तसेच तलाठी पदोन्नतीने मंडळ अधिकारी अशा नुकत्याच बदल्या केल्या. यामध्ये कडेगाव तालुक्यातीलही मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक तसेच अव्वल कारकून यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यात दोन मंडळ अधिकारी नवीन येणार असून कडेगाव चे मंडळ अधिकारी यांचे बदलीने रिक्त झालेल्या आणि नेवरी मंडळ अधिकारी यांचे रिक्त जागी असे दोन मंडळ अधिकारी कार्यभार स्वीकारणार आहेत.
यातील एका मंडळ अधिकारी महोदयांनी आपल्याला उमेदवार (मदतनीस) हवा आहे अशी मुख जाहिरात काढली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच त्यास योग्य मोबदला ही दिला जाईल अशी ही बतावणी केली असल्याचे बोलले जात आहे. मुळात उमेदवार ठेवणे कायद्याने परवानगी आहे का? नाही . तर हे योग्य आहे का? आणि उमेदवारा मार्फत होणारे काम कायदेशीर होणार का ? या प्रश्नाची उत्तरे आता सर्वसामान्य जनता शोधत असून वरिष्ठ यावर योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.

