सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात काही कामे मंजूर केल्याचे जाहीर केले. परंतु, आम्ही मंजूर केलेल्या काही कामांचे श्रेय लाटण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला आहे. ते सांगलीकर जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप पृथ्वीराज पाटील यांनी केला.
सांगली / खबऱ्या प्रतिनिधी:- सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ (MLA Sudhir Gadgil) यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात काही कामे मंजूर केल्याचे जाहीर केले. परंतु, आम्ही मंजूर केलेल्या काही कामांचे श्रेय लाटण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला आहे. ते सांगलीकर जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी उपमहापौर उमेश पाटील, मंगेश चव्हाण उपस्थित होते.
ते म्हणाले, विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी महाविकास आघाडीने केलेल्या आणि मी आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी सुचवलेल्या कामांचे श्रेय घेतलं आहे. गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेत आहे. पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सांगली शहर आणि विधानसभा मतदार संघात निधीसाठी कधीही हात आवडता घेतला नाही.
खोतवाडी गावाजवळच्या ओढ्यावरील पुलासाठी १ कोटी ९० लाख रूपयांच्या कामाला, माजी सैनिकाच्या मागणीनुसार त्रिकोणी बागेत शहीद स्मारक उभारले आहे, बिसूर तासगाव रस्ता इजीमा ९६ रस्ता सुधारणा करण्यासाठी, नावरस वाडी ते कर्नाळ रस्त्यावरील लहान पुलासाठी निधी तसेच इनाम धामणी ते स्फुर्ती चौक या रस्त्याच्या २ कोटीच्या कामाला मी स्वतः सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे जाऊन मंजूरी आणलेली आहे.
तसेच माधवनगर नाका ते रेल्वे ओव्हर ब्रीजसाठी २ कोटीचा निधी काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी मंजूर करून आणला आहे. याशिवाय पालकमंत्री जयंत पाटील यांनी सागंली सिव्हिल हॉस्पिटलच्या खुल्या जागेत मंजूर असलेले मिरज येथे स्थलांतरीत करण्यात आलेले नवजात शिशू रुग्णालय बांधकाम करणे, ४६ कोटी ७४ लाख मंजूरी आणलेली आहे आणि सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या शिफारसीने मंजूर झालेल्या कामांचा यामध्ये समावेश आहे.
तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने शिफारस केल्यानंतर मंजूर झालेली कामे गाडगीळ यांनी स्वतःच्या नावावर खपविण्याचा उद्योग चालविला आहे. ही जनतेची दिशाभूल आहे. ती त्यांनी थांबवावी, असेही पाटील यावेळी म्हणाले.
महापालिका क्षेत्रासाठी दहा कोटींचा निधी….
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ५६ कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाकडून मंजूर झाला असल्याची माहिती पृथ्वीराज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, या कामांसाठी निधी मंजूर व्हावा अशी मागणी आपण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी या कामांची शिफारस करून ती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर करून घेतली. तसेच याकामी सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचेही सहकार्य लाभले.
ही आहेत प्रमुख कामे.
सहकार तपस्वी खा. गुलाबराव पाटील स्मृती उद्यान विकसित करण्याच्या कामाचा समावेश आहे. विश्रामबाग परिसरामध्ये ते विकसीत केले जाणार आहे. याशिवाय सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील रस्ते डांबरीकरण, हॉटमिक्स, आरसीसी गटार, ओपन स्पेस विकसित करणे, उद्यानांचे सुशोभीकरण अशा विविध कामांचा समावेश आहे. त्यानुसार ही कामे मंजूर झाली असून हा निधी ३१ मार्च, २०२३ अखेर खर्च करून सर्व कामे पूर्ण करावयाची आहेत.

