तासगाव, प्रतिनिधी/ तासगाव तालुक्यात राजकीयदृष्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या किंदरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह इतर ३ सदस्यांवर सरकारी जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
तासगाव तालुक्यातील किंदरवाडी ही ७ सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या निवडणूकीत ही सदस्य समिती गठीत झाली होती. मात्र, तक्रारदार नारायण सूर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे ४ सदस्यांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. यात म्हटले होते की, किंदरवाडी ग्रामपंचायतच्या ४ सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केले असून सरकारी जागेचा बेकायदा वापर व उपभोग घेतला आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व कायद्याने अपात्र असल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली.
यासाठी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १६ व १४ (१ ) (ज ३ ) संदर्भ देण्यात आला. या अर्जावर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या दालनात वेळोवेळी सुनावणी झाली. अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे, तपासून जिल्हाधिकारी यांनी अर्जदारांचा विवाद अर्ज मंजूर करून सरपंच राजश्री कचरे, अनिता कचरे, धोंडीराम कचरे व शोभा जाधव या ४ सदस्यांना सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरवत त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशात संबधितांना प्रस्तूत आदेशाच्या विरुद्ध विभागीय आयुक्त पुणे यांचेकडे अपील दाखल करण्यास १५ दिवसांचा अवधी देत असल्याचे म्हटले आहे. किंदरवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सह ३ सदस्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केल्याने तासगाव तालुक्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या कारवाई नंतर संबंधितांच्या प्रभागात पोटनिवडणूक लागणार की ग्रामपंचायतवर प्रशासक राज येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

