कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील नेवरी ग्रामपंचायतीच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभाराने सर्वसामान्य जनता अगदी त्रस्त आणि हैराण झाली असून गावात अस्वच्छता, तुंबलेली गटारी, सांडपाणी रस्त्यावर तर पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार अशा अनेक समस्यांनी ग्रामस्थांना ग्रासलेले असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचं अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक संपली आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीनी पदभार स्वीकारला. नवीन लोकप्रतिनिधी आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारात सुधारणा होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती मात्र प्रशासनाचा कारभार सध्या तरी जैसे थे आहे. गावातील बहुतांश गटारी तुंबलेली आहेत. अनेक ठिकाणी गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावर सोडण्यात आले आहे तर पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या झडपेला (हाँल्वला) गळती लागल्याने गळतीचे बेसुमार पाणी रस्त्यावरून वाहत आहे. याव्यतिरिक्त पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला सुध्दा ग्रामस्थ वैतागले आहेत.

पाणीपुरवठा कर्मचारी नेहमी मद्यधुंद अवस्थेत कामावर हजर असतात आणि ग्रामस्थांशी व्यवस्थित वागत नाहीत ग्रामस्थांच्या प्रश्नांना उलट सुलट उत्तरे देत असतात. याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे तक्रार केली असता काहीही परिणाम होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याउलट तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांच्या प्रभागात पाणीपुरवठा करताना सूडबुद्धीने केला जातो. नवनियुक्त लोकप्रतिनिधीनी गावातील समस्यांकडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

