सांगली : खबऱ्या प्रतिनिधी: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद गमावण्याची नामुष्की ओढवली.
गेल्या अनेक दिवसांमधील या घटनाक्रमांमुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. या बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोल करण्याचे काम शिवसेनेकडून सुरू झाले असले तरी, शिवसेनेतील पदाधिकारी, नेते, नगरसेवक यांचा शिंदे गटाला पाठिंबा वाढताना दिसत आहे.मुंबई, पुण्यानंतर आता सांगलीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर खिंडार पडायला सुरुवात झाली आहे. सांगलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. यावेळेस आनंदराव पवार यांना समजवण्याचा व मनधरणी करण्याचा प्रयत्न संपर्कप्रमुख नितीन बानूगडे पाटील यांनी केला असल्याचे सांगितले जाते.

आनंदराव पवार यांच्या समर्थनार्थ मिरजेतील शिवसेनेचे शहराध्यक्ष विजयराव शिंदे यांनीही राजीनामा दिला आहे. काही आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सुरु आहेत. सांगलीत आता शिवसेनेला संघटनात्मक पातळीवरही खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे सांगलीतूनही शिंदे गटास पाठिंबा मिळत आहे.
सांगलीतील विटा खानापूर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे शिंदे गटात गेल्यानंतरही आतापर्यंत संघटनात्मक पातळीवर कुणीही राजीनामे दिले नव्हते, परंतु आता जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या समर्थनार्थ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.


