कर्मचारी कार्यालयात कमी चहाच्या टपरीवर जास्त
शिस्त लागणार की असंच चालणार?
कडेगांव तालुक्यातील प्रशासन इतके मुजोर कोणामुळे झालं आहे ? असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे. आमदार डॉ विश्वजित कदम यांनी आमसभा घेऊन अजून पंधरा दिवस व्हायचे आहेत तोपर्यंत प्रशासन पुन्हा सर्वसामान्य जनतेला आणि आमदारांच्या कडक सूचनांना फाट्यावर मारू लागले आहे. शासकीय कर्मचारी त्यांचे टेबल वर किंवा त्यांचे कार्यालयात कमी आणि चहाच्या टपरीवरच जास्त पहायला मिळत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या संपर्कातील कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत, मुख्यालयात सोडा काही कर्मचारी तालुक्यात सुद्धा राहत नाहीत त्यामुळे यांना कोणी शिस्त लावणार का ? की हे असंच चालत राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
“लोकांच्या हिताची कामे करा, कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, लोकांच्यावर अन्याय होता कामा नये अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही असा सज्जड दम तब्बल दहा तास चाललेल्या आमसभेत आमदार डॉ कदम यांनी दिला होता,मात्र इथ काही कर्मचारी कामच करीत नाहीत फक्त दिवस भरण्यासाठी कार्यालयात येत असल्याचे चित्र आहे. शासकीय परिपत्रकाप्रमाणे वेळेवर कामावर हजर राहायचं नाही, शासकीय परिपत्रकाप्रमाणे गळ्यात ओळखपत्र घालायचं नाही, निर्धारित वेळेत कामे पूर्ण करायची नाहीत, कार्यालयात काम कमी आणि मोबाईलवर / चहाच्या टपरीवर जास्त वेळ घालवायचा इतके बेशिस्त प्रशासन तालुक्यातील जनतेने यापूर्वी कधीही पाहिले नाही.
सर्वसामान्य जनता कार्यालयात आपले काम करण्यासाठी येत असते आणि त्यांचे काम करणे हे आपले कर्तव्य आहे ,मुळात हाच मुद्दा शासकीय कर्मचारी विसरू लागले आहेत की काय ? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. शासनाच्या कोणत्याही कार्यालयात गेल्यावर सर्वसामान्य जनतेला एखाद्या राजाप्रमाणे वागणूक मिळायला हवी मात्र कडेगांव तालुक्यात ही वागणूक एखाद्या घरगड्या सारखी दिली जाते. जे जाणकार आहेत/राजकीय नेत्या करवी आलेत/ शिफारस किंवा मध्यस्थी घालून आलेत त्यांचीच कामे इथं प्राधान्याने होताना दिसत आहेत मात्र सर्वसामान्य जनतेला इथ न्याय मिळताना दिसत नाही.
पंचायत समितीमध्ये शासनाच्या बालसंगोपन योजनेचे फॉर्म घेण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची मर्जी राखावी लागते. जे फॉर्म साध्या झेरॉक्स सेंटर वरती मिळायला हवेत ते फॉर्म कार्यालयात कर्मचाऱ्याकडूनच मिळतात. संबंधित कर्मचारी नसतील तर परत दुसऱ्या दिवशी फेरी मारायची आणि आपला आणखी एक दिवस वाया घालवायचा. कृषी कार्यालयात शेतकऱ्यांशी निगडीत एकही कर्मचारी वेळेवर सापडत नाही. कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन केले, तरी त्यांच्यावर काहीही फरक पडत नाही. महसूल ,आरोग्य कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत यामुळे सर्वसामान्य जनतेला अपेक्षित सेवा मिळत नाही.
आमदार डॉ विश्वजित कदम यांनी आमसभा घेऊन सज्जड दम दिला मात्र त्यांच्या सूचना, दम आणि सर्वसामान्य जनतेला कडेगांव प्रशासनाने फाट्यावर मारले आहे असेच दिसते त्यामुळे आणि डॉ कदम यांनी दम न देता मुजोर प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना हिसका दाखवावा अशी मागणी होत आहे.

