
खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
देशाच्या जडणघडणीत शरद पवारांचे योगदान नेहमीच मोठे राहिले आहे. त्यामुळे अजूनही शरद पवारांनी देशहितासाठी नरेंद्र मोदींसोबत यावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.ते सोमवारी जत तालुक्याच्या दौर्यावर होते.
यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेस माजी आमदार विलासराव जगताप, रिपाइंचे नेते संजय कांबळे, जगन्नाथ ठोकळे, अशोक गायकवाड, परशुराम वाडेकर, संजय एम. पाटील आदी उपस्थित होते.
शरद पवार यांनी अजूनही मोदींच्यासोबत येण्याचा निर्णय घ्यायला हवा, कारण त्यांच्या पक्षाचे बहुतांशी आमदार देखील सत्तेत जाण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे पवार साहेबांनी देखील आता विकासाच्यादृष्टीने निर्णय घ्यायला हवा, असेही आठवले म्हणाले. जर पवारसाहेब 2014 सालीच एनडीएसोबत आले असते, तर ते राष्ट्रपती झाले असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राच्या सत्तेत आमच्या पक्षावर अन्याय होत असून, हा अन्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर करावा. माझा पक्ष गोरगरिबांचा असून, येथेही सत्तेत आता वाटा मिळायला हवा. त्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. संविधानाच्या बाबतीत विरोधक विनाकारण गैरसमज करत आहेत, परंतु संविधानाला कसलाही धक्का लागलेला नाही, असेही आठवले म्हणाले.
ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणाचा परिणाम शून्य
राज आणि उध्दव ठाकरे यांच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरू आहे. भलेही हे दोघे एकत्र आले तरी, मुंबई महापालिका आणि राज्यात त्यांच्या युतीचा कसलाही परिणाम होणार नाही. मागे लोकसभेला भाजपने राज यांना सोबत घेतले होते, परंतु त्यांचा कसलाही फायदा एनडीएला झालेला नाही. शिवाय राज ठाकरे यांना तर महायुतीत येण्यास माझ्या पक्षाचा कायमच विरोध राहिला असून, तो आजही कायम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.